Saturday 9 April 2016

पती हाच परमेश्वर???



पती हाच परमेश्वर???

आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीत 'पती हाच परमेश्वर' असे म्हटले जाते. हे किती खरे याचा इतिहास जाणून घेण्याऐवजी मूळ संकल्पना जाणून घेणे हितावह आहे.

आजवर 'पती हाच परमेश्वर' हा उपदेश हिंदू समाजात प्रत्येक स्त्रीला देण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी या वचनाचे तंतोतंत पालन स्त्रियांनी केले. पण आजची सुजाण स्त्री या असल्या भ्रामक संकल्पनांना तिलांजली देते आणि स्त्रीपुरुष समान या तत्त्वाचा अवलंब करते .
परंतु भाषेचा अभ्यासक म्हणून एक वेगळा विचार या ठिकाणी प्रकट करू इच्छितो. 

मुळात 'पती हाच परमेश्वर' ही संकल्पना कोणत्याही स्त्रीला लागूच होत नाही. 
बघा हं. नीट विचार करा. '
पती हाच परमेश्वर' या वाक्यात पतीला परमेश्वराची उपमा दिली आहे. याठिकाणी पत्नी आणि इतरांचा काहीच संबंध नाही. जो पुरुष पती ही पदवी घेऊन मिरवतो त्याला परमेश्वरासारखे वागायचे आहे, असा या वाक्याचा अर्थ आहे. आता मला सांगा कोणत्या देवाच्या हातात दारुची बाटली आणि सिगारेट आहे? कोणता देव त्याच्या बायकापोरांना मारतो? शिवीगाळ करतो? वा-यावर सोडतो? जे असे वागतात त्यांना आपण राक्षस म्हणतो.

देव हा जसा सगळ्यांची जबाबदारी स्वीकारतो. सगळ्यांच्या लहान लहान गरजांची काळजी घेतो. नेहमी चेह-यावर स्मितहास्य ठेवतो. सर्वांशी नम्रपणाने बोलतो. संकट स्वतःवर झेलून त्यावर मात करतो. दुष्ट प्रवृत्तींशी कठोर मनाने लढतो. चूक झाल्यावर मोठ्या मनाने सुधारण्याची संधी देतो.
याचप्रमाणे पती हे बिरुद मिरवणा-या प्रत्येकाने आपल्या वागणूकीने कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात, हृदयात स्थान मिळवायला हवे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मान हा मागून मिळत नसतो तर तो आपल्या वागणूकीने मिळवावा लागतो.

'पती हाच परमेश्वर' या वाक्यातून पत्नीने पतीशी कसे वागावे हे सिद्ध होत नाही तर पतीने पत्नीशी आणि कुटुंबाशी कसे वागावे हे सिद्ध होते. तेव्हा सर्व पतींनी परमेश्वरासमान वागायचा प्रयत्न केला तरच ख-या अर्थाने आपण हिंदू संस्कृती जपत आहोत हे सिद्ध होईल आणि तुमची अर्धांगिनी मनापासून म्हणेल, "खरंच बाई. माझे पती हे परमेश्वरच जणू."

चला पतींनो कामाला लागा.

श्रीहरी गोकर्णकर.

About the Author

Shreehari Gokarnakar

Author & Editor

He is a Teacher and researcher in Sanskrit language.

1 comments:

 
SANSKRIT SHREE: © 2015 - Blogger Templates Designed by Templateism.com